नाशिक ग्रामीण प्रतिनिधी : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळगाव बसवंत जवळील आहेरगाव शिवारात बिबट्याने गुरुवारी (दि. १३) धुमाकूळ घातला. बिबट्याने वासरावर हल्ला चढवत त्याचा फडशा पाडला, तसेच तीन शेतकºयांवर हल्ला केला. त्यात एकजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोन शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाने परिसरात दोन पिंजरे लावले आहेत.
आहेरगाव परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून, गावात भितीचे वातावरण आहे. गुरुवारी (दि. १३) पहाटे तीनच्या सुमारास येथील देशमुख वस्तीवरील प्रभाकर देशमुख यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. त्यात वासराच बळी गेला, तर सकाळी साडेआठच्या सुमारास दत्तू पुंजा रसाळ (वय ६०) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, याच परिसरात बिबट्याने प्रशांत गांगुर्डे व श्यामराव गांगुर्डे यांच्यावरही हल्ला करत त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने परिसरात दोन पिंजरे लावले असून, तलाठी यांनी तत्काळ मयत वासरासह जखमी नागरिकांच्या नोंदी घेत पंचनामा केला आहे.
येवला वनक्षेत्रपाल तथा सहायक वन संरक्षक अक्षय म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भगवान जाधव, वनसंरक्षक राजेंद्र दौंड व रेस्क्यू टीम निफाड पथकाने घटनास्थळी भेट देत पिंजरे बसविले
आहे.