सटाणा आगाराला मिळाव्यात अत्याधुनिक ४० बसेस अन्यथा
१५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण छेडणार : बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा इशारा
सटाणा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असले तरी सटाणा आगारातील नादुरुस्त बसेसमुळे सध्या सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. बसस्थानकातून प्रवासाला निघताच ऐन रस्त्यात बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. सटाणा आगारासाठी नवीन बसेस द्याव्या अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री व पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. मात्र अजूनही शासनाकडून या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहे. सटाणा आगारासाठी तातडीने ४० नवीन बसेस मिळाल्या नाही तर येत्या १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा संतप्त इशारा बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी दिला आहे.
यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार सौ.चव्हाण म्हणाल्या, सटाणा आगारातील नादुरुस्त बसेसमुळे सध्या सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. या बसेस रस्त्यात कधीही बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडणार्या या आगारातून दररोज हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाच्या सुस्थितीतील बसेस असणे आवश्यक आहे. परंतु नादुरुस्त बसेसमुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाईलाजास्तव जीवघेण्या व महागड्या खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.
सटाणा आगाराला सटाणा आणि देवळा या दोन तालुक्यांसाठी सेवा द्यावी लागते. एसटी बसेसची धावण्याची मर्यादा दहा वर्षे व दहा लाख किलोमीटर असताना सटाणा आगारातील एकूण ७१ बसेस मात्र सध्या १५ लाखांहून अधिक किलोमीटर अंतर धावलेल्या आहेत. या सर्व बसेसचे वयोमान १५ वर्षे पूर्ण झाल्याने त्या कालबाह्य झाल्या आहेत. मात्र तरीही सर्व फेर्या याच जुन्या बसेसद्वारा होत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. या बसेसचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्टिअरिंग ऑइल नाही, गिअर पडत नाही. रेडीएटरमध्ये पाणी नाही. टायर्सची दुरावस्था, स्टार्टर खराब झाल्यामुळे धक्का मारण्याची वेळ येणे, फॅन बेल्ट नसल्याने मशीन गरम होणे या बाबी नेहमीच्याच झाल्या आहेत.
यामुळे नवीन बस नसल्याने लांब पल्ल्यासाठीही जुन्याच बस वापराव्या लागत आहेत. या बसेस दररोज धावत असल्याने त्या रस्त्यात कधीही-कुठेही बंद पडतात आणि त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करत भर उन्हात रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहावे लागते. याचा मोठा त्रास विशेषत: वृद्ध, लहान मुले आणि महिला प्रवाशांना होतो. या प्रकारामुळे प्रवासी वर्गात संताप व्यक्त केला जात असून प्रवासी नाइलाजाने खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तातडीने सटाणा आगाराला ४० बसेस मिळाव्यात.
सटाणा आगाराच्या बसेस रात्री-अपरात्री निर्जनस्थळी बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून यामुळे कोणतीही जीवित असा वित्तहानी होऊ शकते. परिवहन मंत्र्यांकडे सातत्याने मागणी करूनही नवीन बसेस मिळत नसल्याने शासन जनतेविषयी किती उदासीन आहे, हे दिसून येते.
-दीपिका चव्हाण, माजी आमदार