महापालिकेला ‘बॉण्ड’मधून २०० कोटींचा निधी!

पहिल्याच म्युनिसिपल बॉण्डला ३.९५ पट प्रतिसाद

नाशिक (प्रतिनीधी): नाशिक महानगरपालिकेच्या पहिल्याच म्युनिसिपल बॉण्ड इश्यूला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘एनएमसी क्लिन गोदावरी बॉण्डस २०३० – सीरीज १’ या नावाने खासगी प्लेसमेंटद्वारे काढलेल्या बॉण्ड इश्यूद्वारे महापालिकेने २०० कोटी रुपये उभे केले आहेत.

१०० कोटींच्या बेस इश्यूच्या तुलनेत तब्बल ३९५ कोटींची मागणी येत इश्यू ३.९५ पट ओव्हरसब्स्क्राईब झाला. इश्यू खुले झाल्यानंतर काही मिनिटांतच बेस इश्यू पूर्ण भरल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. या बॉण्डवर ७.८० टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. ‘ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लि.’ यांनी मर्चंट बँकर व ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझर म्हणून कार्य केले.

या बॉण्डला क्रिसीलइंडिया रेटिंग्ज या मानांकन संस्थांकडून AA+ रेटिंग देण्यात आले आहे. व्याज आणि मूळरक्कम अचूक वेळेत फेडण्याकरिता कर, शुल्क, दंड तसेच उत्पन्नाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या इस्क्रो खात्याची यंत्रणा लागू करण्यात आली आहे.

या प्रकल्पांमध्ये होणार वापर

बॉण्डद्वारे उभा केलेला निधी खालील महत्त्वाच्या कामांसाठी वापरण्यात येणार आहे.

  • रामझुला व पादचारी पुलाचे बांधकाम
  • काळाराम व कपालेश्वर मंदिर परिसरातील रामकाल पथ प्रकल्प
  • पंचवटी, सातपूर व पश्चिम नाशिकमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुधारणांकरिता
  • यात्रेकरू व नागरिकांसाठी सुविधा विकास

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाश्वत आणि भविष्याभिमुख पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा महापालिकेचा संकल्प या निधीमुळे अधिक बळकट झाला आहे.

 

केंद्र सरकारकडून मिळणार अतिरिक्त लाभ

म्युनिसिपल बॉण्डच्या यशस्वी इश्यूमुळे नाशिक मनपास २६ कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. तसेच हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड (UCF) योजनेअंतर्गत पात्र असल्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या २५% म्हणजेच अंदाजे ६८.७५ कोटींचे अतिरिक्त सहाय्य मिळण्याची शक्यता आहे.

यामुळे विकासकामांना मिळणारे एकूण प्रोत्साहनाचे मूल्य ९४.७५ कोटी रुपये इतके होणार आहे. नाशिक महापालिकेच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सार्वजनिक विश्वासाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे नगर प्रशासनाचे मत आहे. महापालिकेच्या या पावलामुळे शहरी विकासातील नव्या संधींना चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *