मोठी बातमी! ‘टीईटी’चा पेपर फुटला, TET 2026 परीक्षा ऐनवेळी स्थगित; भिवंडीत कथित पेपरफुटीचा संशय, लाखो उमेदवारांना धक्का

TET 2026 परीक्षा ऐनवेळी स्थगित; भिवंडीत कथित पेपरफुटीचा संशय, लाखो उमेदवारांना धक्क

राज्यात रविवारी (दि. २८ जून) होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला. परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

भिवंडीत पहाटे छापा, संशयास्पद साहित्य जप्त

शनिवारी (दि. २७ जून) पहाटे भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काही व्यक्तींवर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान टीईटी परीक्षेशी संबंधित संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले.

मूळ प्रश्नपत्रिकेशी प्रश्न जुळल्याचा प्राथमिक दावा

घटनास्थळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जप्त साहित्याची पडताळणी केली. प्राथमिक तपासात काही प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे समोर आल्याने भिवंडी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

यंदाची टीईटी परीक्षा राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर होणार होती. मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशीच कथित पेपरफुटीचा प्रकार उघड झाल्याने संपूर्ण परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडणे हेच परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने २८ जूनची परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.”

नवीन परीक्षा तारीख लवकरच

सुधारित परीक्षा वेळापत्रक आणि पुढील सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळावा

या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिक्षण विकास मंचाचे मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी सांगितले की, कथित पेपरफुटीमुळे हजारो प्रामाणिक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी तसेच नव्या परीक्षेची तारीख तातडीने जाहीर करून उमेदवारांना न्याय द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *