इंदिरानगरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला; शटर वाकवून लाखोंचा ऐवज लंपास
नाशिक : इंदिरानगर परिसरातील पार्क साईट भागात ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या चोरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पार्क साईट परिसरात राहुल प्रकाश कदम यांच्या मालकीचे ‘माऊली ज्वेलर्स’ हे दुकान आहे. शुक्रवारी, ७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अंदाजे ३ ते ३.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरला लक्ष्य केले. शटर वाकवून दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी आतील मौल्यवान वस्तू व मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या दुकानमालक राहुल कदम यांच्या निदर्शनास शटर वाकलेल्या अवस्थेत आले. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानाची पाहणी करून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाची मदत घेण्यात आली आहे.
दरम्यान, दुकान तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहे. चोरट्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि चोरीनंतर ते कोणत्या दिशेने पसार झाले, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे इंदिरानगर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ज्वेलर्सच्या दुकानाला लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत आणि तपशील पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.