अंबड पोलीस ठाण्याची सूत्रे आता जयंत शिरसाट यांच्याकडे!
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांची बदली; वाढती गुन्हेगारी, वाहतूक अन् कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटनांसह विविध सामाजिक प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्थेच्या आव्हानांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांच्यावर अंबडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जयंत शिरसाट यांनी यापूर्वी उपनगर पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळताना कायदा-सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारी नियंत्रणावर भर दिला आहे. त्यामुळे अंबड परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासोबतच वाहतूक कोंडी, अवैध प्रकार, नागरिकांच्या तक्रारी आणि संवेदनशील भागातील कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
अंबड परिसरात औद्योगिक वसाहत, वाढती लोकवस्ती आणि झपाट्याने होणारे नागरीकरण यामुळे पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान कायम असते. या पार्श्वभूमीवर नव्या नेतृत्वाकडून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, प्रतिबंधात्मक कारवाई आणि नागरिकांशी समन्वय वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या बदलीनंतर अंबड पोलीस ठाण्यात नव्या नेतृत्वाखाली कामकाज सुरू होणार आहे. शिरसाट यांच्या कार्यपद्धतीकडे आणि अंबड परिसरातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी ते कोणती पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.