नाशिक | प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचे वय लपवून बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न लावून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिक आणि सोलापूर पोलिसांच्या कारवाईत कथित बोगस विवाह रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षे ८ महिने वयाची मुलगी आपल्या आईसोबत नाशिकला आली होती. याचदरम्यान तिच्या कुटुंबाची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. मुलीच्या आईला आर्थिक आमिष दाखवून मुलीला काही काळासाठी सोबत नेण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर मुलीची खोटी ओळख निर्माण करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. मुलीचे नाव आणि कौटुंबिक ओळख बदलून तिला सज्ञान असल्याचे भासवण्यात आले. तसेच बनावट आधारकार्ड व इतर कागदपत्रांचा वापर करून विवाहाची प्रक्रिया करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
त्यानंतर मुलीचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एका तरुणासोबत ठरवण्यात आला. या कथित व्यवहारात मध्यस्थांनी संबंधित कुटुंबाकडून सुमारे २ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलीला सांगोला तालुक्यातील संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले.
मात्र तेथे पोहोचल्यानंतर मुलीने आपल्या आईशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. आपले वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे तिने स्पष्ट करत विवाहास नकार दिला. परिस्थिती लक्षात आल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि मुलीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणातील तक्रार सांगोला पोलीस ठाण्यातून शून्य क्रमांकाने नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करणे, खोटी ओळख निर्माण करणे आणि अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याच्या आरोपांप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कथित रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, बनावट कागदपत्रे कोणी तयार केली आणि अशा प्रकारे आणखी किती विवाह लावून देण्यात आले आहेत का, याचा तपास नाशिक व सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे.