मुकणे धरणावर जात ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची केली मागणी
सिडको प्रतिनिधी/: मुकणे पंपिंग स्टेशनमधील चार स्टार्टर जळाल्याने गेल्या चार दिवंसापासून नवीन नाशिक परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला होता तर काही ठिकाणी अवेळी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नवीन नाशिक परिसरातील महिला वर्ग पाणीटंचाईने त्रस्त झालेत. विस्कळीत पाणीपुरवठया संदर्भात महिलांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेत आमदार सीमा हिरे यांनी महिला नगरसेवक, असंख्य कार्यकर्त्यांसह थेट पंपिंग स्टेशनवरच धडक मारली.
स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी हि संबंधित ठेकेदाराची असून त्यांच्या हलगर्जीपणामुळेच गेल्या काही दिवसात चार स्टार्टर जळाले. परिणामी, सिडकोवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावेळी आमदार यांच्या सोबत प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, पुष्पा आव्हाड,कावेरी घुगे या महिला नगरसेवकांसह अजिक्य चुंबळे, बाबा पवार, अजिक्य गिते, एकनाथ नवले, साहेबराव आव्हाड, अनिल चोरडिया, नितीन पाटील, मोगल सर आदींसह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
मुकणे धरणावर पोहचताच नगरसेवक महिलांनी विस्कळीत पाणीपुरवठ्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.पाणीपुरवठा विभागाचे धारणकर यांच्या कार्यपध्दतीमुळेच सिडकोवासियांवर अन्याय होत असल्याचा संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी माहिला नगरसेवकांनी केली. पाण्याचं राजकारण करून बडगुजर कंपनीकडून पाणी सोडण्याच्या कामात सततच दुजाभाव केला जात आहे. ठेकेदाराचे पंपिंग स्टेशनमधील यत्रंणेकडे गाभिर्याने लक्ष नसल्याने गेल्या काही दिवसात चार स्टार्टर जळाले असून ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे सिडकोवासियांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. ठेकेदाराच्या अक्षम्य हलगर्जीपणावर महानगरपालिका का कारवाई करत नाही. महानगरपालिकेचे अधिकारी ठेकेदाराच्या दबावाखाली का असतात अशा प्रश्नांचा भडीमार करत महिला नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. सतत गढूळ आणि अळ्या युक्त पाणी पुरवठा होवूनही अधिकारी ठेकेदारावर कोणतीच कारवाई करत नाहीत. येत्या दोन ते तीन दिवसात नवीन स्टार्टरची पूर्ण रक्कम भरून घेवून ठेकेदाराचा ठेका रद्द न केल्यास धरणातील पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा अजिक्य चुंबळे यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना दिला. यावेळी कार्यकारी अभियंता एस.टी. जाधव, उपअभियंता राजाराम भोये, एजाज काजी, सिडको पाणी पुरवठा विभागाचे अभियंता किरण लोणे, जितेंद्र चव्हाण आदी उपस्थितीत होते.
महिलांनी केला तीव्र संताप व्यक्त
मा नगरसेविका छायाताई देवांग याच्या सोबत अनेक महिलांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर येथील भागात दोन- दोन दिवस पाणी न आल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. मनपा प्रशासन, पाणीपुरवठा अधिकारी यांनी याची गंभीर दखल घ्यावी व नियमित स्वच्छ सुरळीत पाणीपुरवठा करावा असे म्हटले आहे. अन्यथा पुन्हा जन आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.