सिडको प्रतिनिधी/: पाथर्डी फाटा येथे दीड महिन्यांपूर्वी दोन अपघातांमध्ये दोघांचा तर गोविंदनगर रस्त्यावर रविवारी 16 फेब्रुवारीला झालेल्या अपघातात महिला शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे गोविंदनगर रस्त्यावर सोमवारी (दि. 17) दिवसभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या लगत असलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत ट्रकभर साहित्य जमा करण्यात आले. महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या अधिकारी जयश्री बैरागी व अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून या भागातील अतिक्रमणे तोडली.
गोविंदनगर रस्त्यावर रविवारी एका भरधाव कारने महिलेला उडवले. या अपघातात महिलेला प्राण गमावावे लागले. गोविंद नगर रस्त्यावर मोठ्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी अनधिकृतपणे फळ विक्रेते, खाद्य विक्रेते, कपड्यांची विक्री करणारे विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. या दुकानांवर वस्तू खरेदी करण्यासाठी, खाद्यपदार्थ घेण्यासाठी नागरिक रस्त्यावरच गाडी लावून थांबतात. त्यामुळे वाहनधारकांना गाडी चालवताना अंदाज येत नाही. त्यातच भरधाव गाडी चालवणाऱ्या चालकांकडून अपघात होण्याची शक्यता असते. मोठ्या संख्येने अतिक्रमणे असूनही महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी कारवाई झालेली नाही. त्यामुळेच एका दुर्दैवी अपघातात महिलेला आपले प्राण गमवावे लागले. अखेर या अपघातानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागी झाली असून अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे सोमवारी या भागात धडक कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साह्याने सर्व अतिक्रमणे तोडण्यात आली. रस्त्याच्या लगत असलेल्या अनधिकृत टपरीधारक, खाद्य विक्रेते व इतर अनधिकृत विक्रेत्यांवर महापालिका अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख निखिल तेजाळे व प्रकाश नाठे रवींद्र काथवटे मिलिंद ढोले मंदार परांडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवावीत
कुणाल धात्रक सामाजिक कार्यकर्ते
इंदिरानगर बोगदा ते सिटी सेंटर मॉल या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खाद्य विक्रेते, फळ विक्रेते तसेच इतर विक्रेत्यांनी अतिक्रमने केली आहेत त्यामुळे रस्त्याची रुंदी ही दिवसेंदिवस कमी होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. गाड्यांचा वेग देखील प्रचंड जास्ती असतो. महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर एका महिलेला आपला जीव गमवावा लागला नसता. त्यामुळे अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवावीत.
जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या शिवसेना ठाकरे गट नाशिक महानगरचा ठराव नाशिक प्रतिनिधी:/ जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य…