जुना कसारा घाट सहा दिवस बंद राहणार, मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई-नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील ६ दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सहा दिवस जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अवजड वाहनांना सहा दिवस पूर्णपणे बंदी असणार आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर सोमवारी २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च ते ६ मार्च या दोन टप्प्यात जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद राहणार आहे. नाशिकच्या दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे.

सहा दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीत मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. जुना कसारा घाट दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने लहान वाहनांची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे. पण तेथे अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे. ही अवजड वाहने मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहेत.

जुन्या कसारा घाटातील जुने महाकाय वृक्ष, डोकावणाऱ्या दरडी या सहा दिवसात काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. सहा दिवसांच्या कालावधीत वाहनचालकांना होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *