अनोखे हळदी-कुंकू ….  ‘स्वच्छतेचा संदेश देत ४५० महिलांना दिले डस्टबिनचे वाण; मासिक पाळीतील स्वच्छतेसह सॅनिटरी पॅडच्या विघटनाबाबतही मार्गदर्शन

अनोखे हळदी-कुंकू ….

 ‘स्वच्छतेचा संदेश देत ४५० महिलांना दिले डस्टबिनचे वाण; मासिक पाळीतील स्वच्छतेसह सॅनिटरी पॅडच्या विघटनाबाबतही मार्गदर्शन

प्रतिनिधी नाशिक :/ ‘स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर’ हा संदेश देत हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये परिसर आणि शारिरिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी तब्बल ४५० महिलांना वाण म्हणून डस्टबिनच देण्यात आले. तसेच महिलांना मासिक पाळीतील स्वच्छता, सॅनिटरी पॅडचे विघटन याबाबतही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नमस्ते फाउंडेशनतर्फे पार पडलेला हा उपक्रम आता ५ गावांमध्येही होणार असून २००० डस्टबिन वाटपाचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला आहे.

नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेह देव व सेल्फ डिफेन्स ट्रेनर रूपाली पवार यांच्यासह सदस्यांनी वाडीवडे येथे ‘सौभाग्याचे लेणं’ हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास परिसरातील जवळपास ४५० अधिक महिलांची उपस्थिती होती. कर्नल मच्छिंद्र शिरसाठ यांनी महिला सुरक्षिततेवर तर देव यांनी ‘स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर’ ही संकल्पना मनात ठेवून, महिला सशक्तीकरण आणि पर्यावरणरक्षण यांसारख्या मुद्द्यांवर माहिती दिली. महिलांच्या स्वच्छता, आरोग्यावर जनजागृती फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमीत्ताने सहभागी महिला, शालेय मुलींना मासिक पाळीच्या काळात आरोग्य स्वच्छता, सॅनिटरी नॅपकिनचा वापर करणे महत्वाचे असल्याचे सांगत तो न केल्याने महिलांना विविध आजारांची लागण होते, त्याची लक्षणेदेखील सांगण्यात आली.

यावेळी होतकरू व कष्टकरी महिला ज्या कुटुंब सांभाळून व्यवसाय करणाऱ्या महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. तर १०० महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष देव यांच्यासह आर्टिस्ट आशा महाजन, ज्वेलरी मेकर भाग्यश्री कदम, सीनिअर असोसिएट शीतल पाटील, सपना जैन, प्रतिभा सूर्यवंशी, अलका देव आदी महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमाबद्दल फाउंडेशनच्या सदस्यांचा ग्रामस्थांकडून सरपंच रोहिदास भाऊ कातोरे, बाणेश्वर मालुंजकर, उपसरपंच प्रवीण मालुंजकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *