फी न दिल्यामुळे निकाल रोखला! अनुदानित शाळेच्या कारभाराने संतप्त पालकांचा उद्रेक; पोलीस ठाण्यात तक्रार, मान्यता रद्दची मागणी
प्रतिनिधी नाशिक, १ मे: नाशिकच्या अभिनव बालविकास मंदिर, सिडको या 100% अनुदानित शाळेने थेट विद्यार्थ्यांचे भविष्य गहाण ठेवत निकाल रोखल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आला. बेकायदेशीरपणे ७५०० रुपयांची फी मागणाऱ्या शाळेविरोधात शेकडो पालकांनी संतापून थेट शाळेसमोर ठिय्या आंदोलन छेडले.
फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे गुणपत्रक थांबवणाऱ्या शाळा प्रशासनाच्या निर्णयाने वातावरण चिघळले. तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी अंबड पोलिस ठाण्यात धडक देत मुख्याध्यापिका, अधीक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. शाळेने निकालपत्र न देण्याचा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा थेट भंग आहे, असे स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला.
विशेष म्हणजे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या आदेशावरही शाळा प्रशासनाने कानाडोळा केला. चौकशी समितीच्या अध्यक्षा किरण कुवर यांनी तात्काळ निकाल देण्याचे आदेश शेराबुकमध्ये नोंदवले, तरीही विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागला.
आंदोलनादरम्यान महिला पालकांशी अपमानास्पद वर्तन झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला असून, पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. उलट, शाळेनेच पोलिसांद्वारे पालकांवर दबाव आणल्याचा आरोपही झाला आहे.
शाळेच्या बेजबाबदार वर्तनामुळे तिच्या मान्यतेवरच टांगती तलवार लटकू लागली आहे. शिक्षण उपसंचालकांनी पुढील २-३ दिवसांत शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार असल्याची माहिती दिली आहे.
१ जून रोजी शाळा सुरू होताच गुणपत्रक व दाखले न दिल्यास, वर्गात प्रवेश न दिल्यास, शाळेसमोर हजारोंच्या संख्येने ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा अंतिम इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.