राज्यात पावसाचा अंदाज, पावसाचे यलो अलर्ट जारी
नाशिकसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा
राज्यात उकाडा कायम असून मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठ दिवसांत महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरू होतील तसेच हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे.
सध्या अनुभवास येत असलेली उष्णतेची तीव्रता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मागील काही वर्षांत मे महिन्यात उष्णतेची लाट सरासरी तीन चार दिवस राहायची, मात्र यंदा ती पाच सहा दिवस टिकत आहे.
दरम्यान, नाशिकचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून, अकोला, जळगाव, सोलापूर येथील कमाल तापमान ४४ तर पुणे शहरात यंदाच्या मे महिन्यातील विक्रमी ४३ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, ६ मे पासून हवामानात बदल होणार असून, टप्प्याटप्प्याने पावसाच्या सरी पडणार आहेत.