नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर राष्ट्रीय, राज्य मार्गांच्या विस्तारीकरण यासोबतच रिंगरोडला केंद्र शासनाची मंजुरी तर द्वारका सर्कल येथे दोन टप्प्यात काम होणार – देवेंद्र फडवणीस यांनी गडकरींसोबतच्या बैठकीनंतर दिली ही माहिती
नाशिक मध्ये २०२७ मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून या कुंभमेळ्यास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होतील यामुळे भाविकांना प्रवासात करताना रस्त्यांचा प्रश्न भेडसावणार नाही याचबरोबर सुरळीत वाहतूक होईल याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.
आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची नागपूर मध्ये मीटिंग पार पडली. यावेळी नाशिक मधील विविध रस्त्यांबाबत चर्चा होऊन राष्ट्रीय महामार्ग चे विस्तारीकरण यासोबत अंतर्गत रस्त्यांचे काम करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.
नाशिकला जोडणाऱ्या विविध महत्वपूर्ण शहरांच्या रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. यासोबतच अंतर्गत रस्ते, रिंगरोड व सर्वांसाठी डोकेदुखी ठरलेला द्वारका सर्कल याबाबतही नियोजन करण्यात आले असून कुंभमेळ्याच्या धरतीवर द्वारका सर्कलचे दोन टप्प्यात काम करण्यात येणार आहे जेणेकरून भाविकांना वाहतुकीस त्रास होणार नाही असे प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री व कुंभमेळ्याचे प्रभारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत गडकरी यांनी जवळपास सर्वच रस्त्यांना मान्यता दिली आहे. त्यानंतर आता लवकरच या रस्त्यांचा डीपीआर करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे सिंहस्थाच्या काळात जी काही वाहतूक निर्माण होईल, त्यासाठी विस्तारित रोड उपलब्ध होणार आहेत”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.