वीज थकबाकीचा भडका : सामान्यांना शिक्षा, मोठे थकबाकीदार सुरक्षित!

नाशिक (प्रतिनिधी):  महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक वर्गातील चार लाख ११ हजारांहून अधिक ग्राहकांकडे तब्बल ५६ कोटी ३३ लाख रुपयांची वीज देयके थकली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही थकबाकी वसूल न झाल्यास ग्राहकसेवेवर थेट परिणाम होणार असल्याचा इशारा देत, महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर यांनी अधिकाऱ्यांना थेट वसुली मोहिमेत उतरून ती यशस्वी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

नाशिक येथील ऊर्जा व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत नाशिक परिमंडळातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

ग्राहकसेवा अधिक गतिमान करण्यासाठी देखभाल-दुरुस्ती आणि महसूल-वसुली अशी स्वतंत्र विभागणी करण्यात आली असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच, दरमहा अचूक वीजबिल, वेळेत जोडण्या आणि सेवा देणे बंधनकारक असल्याचे निर्देश देण्यात आले.

“प्रत्येक महिन्याच्या अखेरीस शून्य थकबाकी हेच उद्दिष्ट असले पाहिजे,” असे ठाम मत व्यक्त करत पडळकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना कसोशीने काम करण्याचे आवाहन केले.

या बैठकीस नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंते जगदीश इंगळे, रमेशकुमार पवार, देवेंद्र सायानेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, हेमंत भामरे तसेच अहिल्यानगर, नाशिक व मालेगाव मंडळातील अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *