इगतपुरी | प्रतिनिधी : इगतपुरी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असतानाच प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. भाजपचे नगरसेवकपदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांच्याविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे इगतपुरीतील निवडणूक रणधुमाळीत राजकीय आरोप–प्रत्यारोपांना अधिक धार आली आहे.
प्रचारादरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या कथित प्रकारांमुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, निवडणूक प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली ही तक्रार पोलिस निरीक्षक सारिका अहिराराव यांच्याकडे देण्यात आली. यासोबतच सदर प्रकरणाची दखल घ्यावी, यासाठी पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही स्वतंत्रपणे निवेदन सादर करण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर असून, कोणत्याही प्रकारच्या दबाव, धमकी किंवा गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशासनातील ओळखी व प्रभावाचा वापर करून विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. प्रचारादरम्यान धमकी, अडथळे व वातावरण बिघडवण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशा घटनांमुळे इगतपुरी नगरपरिषद निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडणे कठीण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भाजप उमेदवार संजय इंदुलकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सदर प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण कोणत्याही प्रकारे धमकी, दहशत अथवा गैरप्रकारात सहभागी नसल्याचे त्यांनी सांगितले असून, राजकीय हेतूने आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसली, तरी पोलिस प्रशासनाने प्रकरणाची नोंद घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे संकेत दिले आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यावेळी तक्रार देताना आमदार हिरामण खोसकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, तसेच गोरख बोडके, प्रशांत कडू, देवीदास जाधव, संजय खातळे, विनायक पाटील, अमोल बोरावके, विलास खातळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या तक्रारीमुळे इगतपुरीतील नगरपरिषद निवडणूक अधिकच चुरशीची व वादग्रस्त बनली असून, पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाची भूमिका व पोलिसांची पुढील कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.