नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील दोन अनोळखी आरोपींना अवघ्या १२ तासांत शोधून काढत गुन्हे शाखा युनिट–२, नाशिक शहरने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या कारवाईत दोन्ही आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा ॲक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली आहे.
अंबड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११०, ३५२ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मोपेडवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून पसार झाल्याची घटना घडली होती. सदर गुन्हा गांभीर्याने घेत मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा युनिट–२ला तपासाचे आदेश दिले.
मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट–२च्या पथकाने घटनास्थळ परिसरातील ८ ते १० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित आरोपी पठाणफाटा–अंबडगाव परिसरात मोपेडवर फिरत आहेत. त्यानुसार सिडको हॉस्पिटलजवळ सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शमशुद्दीन नसीरुल्ला शहा (वय ५२, रा. चुंचाळेगाव, अंबड लिंक रोड) व संतोष मनिराम सरोज (वय ३४, रा. साईनगर, अंबड लिंक रोड) अशी आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातील अंदाजे ६० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा (क्र. एम.एच. १५ एच.पी. २९९३) जप्त करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे शाखा युनिट–२च्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक हेमंत टोंडकर, यशवंत बेंडकोळी, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत घोडके, वाल्मिक चव्हाण, महेश खांबाळे, तेजस मते, प्रविण वानखेडे व चापोअंमलदार जितेंद्र वाघरे यांनी केली.