अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदूरकर तडकाफडकी कार्यमुक्त; महत्त्वाच्या विभागांमध्ये फेरबदल!
नाशिक (प्रतिनिधी) : महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली असून आयुक्त मनीषा खत्री यांनी विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यापक फेरबदल करत आदेश जारी केले आहेत. या बदलांमध्ये अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदूरकर यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी धुळे महापालिकेतून बदली होऊन त्या नाशिकमध्ये रुजू झाल्या होत्या.
दखणे रुजू होताच समीकरणे बदलली: उपायुक्त सुवर्णा दखणे या मातृत्व रजेवरून नुकत्याच कामावर रुजू झाल्या. रजेपूर्वी त्यांच्या ताब्यात असलेला अतिक्रमण निर्मूलन विभाग व माहिती-तंत्रज्ञान विभागाचा कार्यभार तात्पुरता संगीता नांदूरकर यांच्याकडे देण्यात आला होता. दखणे यांनी रुजू होताच अतिक्रमण विभाग आणि जाहिरात परवाना विभागाची जबाबदारी पुन्हा त्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे खालील विभागांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे : माहिती व तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय फेरीवाला धोरण, सुरक्षा विभाग, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, स्लम विभाग या विभागांचा व्याप मोठा असून शहरातील दैनंदिन प्रशासनावर त्यांचा थेट परिणाम होतो.
कर व घनकचरा विभागातही फेरबदल : प्रशासकीय बदलांचा फटका कर व घनकचरा व्यवस्थापन विभागालाही बसला आहे. उपायुक्त अजित निकत यांच्याकडील कर वसुली विभागाचा कार्यभार यापूर्वीच सुवर्णा दखणे यांच्याकडे देण्यात आला होता. आता घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या निकत यांच्याकडील काही जबाबदाऱ्या काढून त्या डॉ. आवेश पलोड यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महसूल आणि स्वच्छता या दोन्ही महत्त्वाच्या विभागांमध्ये नेतृत्वबदल झाल्याचे चित्र आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये नाशिक महापालिकेत रुजू झालेल्या संगीता नांदूरकर यांना अल्पावधीतच कार्यमुक्त केल्याने प्रशासकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अधिकृतरीत्या कोणतेही कारण जाहीर करण्यात आले नसले तरी अतिक्रमण कारवायांबाबत घेतलेल्या निर्णयांवरून हा बदल झाल्याची चर्चा आहे. अतिक्रमण, कर वसुली आणि घनकचरा व्यवस्थापन हे शहराच्या प्रशासनातील अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचे विभाग मानले जातात. या विभागांतील फेरबदलांमुळे आगामी काळात प्रशासनाच्या कामकाजात गती येते की आणखी बदल घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेत अलीकडील काळात सातत्याने प्रशासकीय फेरबदल होत असल्याने स्थैर्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांकडून शहरातील प्रलंबित प्रश्नांवर जलद निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या खांदेपालटीनंतर अतिक्रमण कारवाया, कर वसुली मोहीम आणि घनकचरा व्यवस्थापनातील सुधारणा यामध्ये कोणते नवे धोरण राबवले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.