नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात भूकंपाचे सौम्य हादरे; प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष
नाशिक, दि. ६ ऑगस्ट २०२६ : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण आणि पेठ तालुक्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला असून, कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, कळवण तालुक्यातील दळवट तसेच पेठ तालुक्यातील आसरबारी परिसरात दुपारी साडेतीन वाजल्यानंतर काही मिनिटांच्या अंतराने नागरिकांना जमिनीला कंप जाणवला. धक्क्यांचा कालावधी अल्प असल्याने मोठी दुर्घटना टळली.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर महसूल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने संबंधित भागात तत्काळ माहिती संकलन सुरू केले. प्राथमिक पाहणीत कोणत्याही घरांचे नुकसान, जखमी किंवा इतर अनिष्ट घटना घडल्याची नोंद नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. संबंधित यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS), नवी दिल्ली येथील तज्ज्ञ पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून, भूकंपाच्या धक्क्यांचे स्वरूप, केंद्रबिंदू आणि त्यामागील कारणांचा तांत्रिक अभ्यास केला जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे सांगितले आहे. तसेच कोणतीही संशयास्पद किंवा आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.