मौजमजेसाठी मोटरसायकल चोरणाऱ्या ४ विधीसंघर्षित बालकांकडून ११ दुचाकी जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन पथकाने मोठी कारवाई करत मौजमजेसाठी (Joy Riding) दुचाकी चोरणाऱ्या चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून ११ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीस शिपाई कांदळकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता आणखी तीन साथीदारांचा सहभाग समोर आला. त्यानंतर पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता विविध ठिकाणांहून चोरलेल्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
या कारवाईत एमआयडीसी पोलीस ठाण्यातील ४, गंगापूर पोलीस ठाण्यातील २, सातपूर पोलीस ठाण्यातील १, दोंडाईचा पोलीस ठाण्यातील १ आणि मोखाडा पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित दोन दुचाकींपैकी एका वाहनाच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दुसऱ्या वाहनाची माहिती आरटीओकडून मागविण्यात आली आहे.
तपासादरम्यान या अल्पवयीन मुलांनी दुचाकी विक्रीसाठी नव्हे, तर केवळ फिरण्यासाठी आणि मौजमजेसाठी (Joy Riding) चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही उल्लेखनीय कारवाई नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री. संदीप कणिक, झोन-२ चे पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे आणि अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.