लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपणार! एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार – मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती
एप्रिल महिना संपला तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नसल्याने हप्ता जमा होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींना आता वाट बघण्याची गरज नाही. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून (२ मे) सुरू करण्यात आली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल व सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० ऐवजी दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होतं. मात्र, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या निर्णयावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात सध्या तरी १५०० रुपये जमा होणार आहेत.