संकल्पपूर्ती! ३३३३ दिवस अखंड ‘विवेक विचार’ प्रसारित करून प्रा. अमोल अहिरे यांची जागतिक विक्रमाला गवसणी
शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रा. अमोल अहिरे यांचा सन्मान
नाशिक | प्रतिनिधी : दाभाडी (जि. नाशिक) येथील भूमिपुत्र आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, नाशिक शाखेचे माजी नगरप्रमुख प्रा. अमोल अहिरे यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा सातत्यपूर्ण संकल्प तब्बल ३३३३ दिवस अखंडपणे पूर्ण करून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेने दखल घेतली असून, मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते त्यांना जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
ना. दादाजी भुसे यांनी प्रा. अहिरे यांच्या सातत्यपूर्ण आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचे कौतुक केले.
३१ मे २०१७ पासून ‘विवेक विचार’चा अखंड प्रवास
मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथील जी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या १८ वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. अमोल अहिरे यांनी २०१७ मध्ये विवेकानंद केंद्राच्या सात दिवसीय निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सहभाग घेतला होता.
या शिबिराच्या समारोपाच्या वेळी त्यांनी दररोज स्वामी विवेकानंदांच्या साहित्याचे वाचन करून त्यातील प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. त्यातून ‘विवेक विचार संदेश’ या उपक्रमाची सुरुवात झाली.
३१ मे २०१७ पासून सुरू झालेला हा उपक्रम ३३३३ दिवस अखंडितपणे सुरू राहिला. नियमित वाचकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात आला.
दहा भाषांमधून १२ राज्यांत विचारांचा प्रसार
‘विवेक विचार संदेश’ हा उपक्रम केवळ मराठी भाषेपुरता मर्यादित न राहता मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, गुजराती, बंगाली आणि संस्कृत अशा दहा भाषांमधून देशातील विविध राज्यांमध्ये प्रसारित केला जातो.
महाराष्ट्रासह देशातील तब्बल १२ राज्यांमध्ये समाज माध्यमांच्या माध्यमातून हे संदेश नियमितपणे पोहोचविले जात आहेत.
अमेरिका, ब्रिटन आणि मॉरिशसमध्येही प्रसार
या उपक्रमाचा प्रभाव देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही पोहोचला आहे. अमेरिका, युनायटेड किंगडम आणि मॉरिशस येथील भारतीय नागरिकांकडूनही इंग्रजी भाषेतून हे विचार समाज माध्यमांवर प्रसारित केले जात आहेत.
दररोज पहाटेच्या सुमारास देश-विदेशातील पाच लाखांहून अधिक लोकांपर्यंत ‘विवेक विचार संदेश’ पोहोचत असल्याचे प्रा. अहिरे यांनी सांगितले.
२०० हून अधिक शाळांच्या फलकांवर दररोज ‘विवेक विचार’
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संदेशामध्ये प्रा. अहिरे स्वतःचा नामोल्लेख करत नाहीत. त्यामुळे हे विचार वाचक सहजपणे पुढे पाठवतात.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांसोबत दिनविशेष, तिथी, वार, भारतीय सौर दिनदर्शिका आणि युगाब्द यांसारखी माहितीही संदेशामध्ये दिली जाते. त्यामुळे राज्यातील २०० हून अधिक शाळांच्या फलकांवर शिक्षकांकडून दररोज हे संदेश लिहिले जातात.
काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी ‘विवेक विचार संदेश’ या नावाने स्वतंत्र नोंदवही तयार करून या विचारांचे संकलनही केले आहे.
विविध दैनिकांमध्ये नियमित प्रसिद्धी
‘विवेक विचार संदेश’ या उपक्रमाची दखल राज्यातील विविध दैनिकांनी घेतली आहे. सध्या पाच दैनिकांमधून हे संदेश सातत्याने प्रकाशित केले जात आहेत.
संदेशांमध्ये विचारांची पुनरावृत्ती होत नसल्याने वाचकांची उत्सुकता कायम राहते. नाविन्यता, कल्पकता आणि सातत्य हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.
११ जागतिक विक्रमांसह ५१ पेक्षा अधिक पुरस्कार
प्रा. अमोल अहिरे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्याची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या नावावर यापूर्वी ११ जागतिक विक्रम नोंदविले गेले असून, विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ५१ हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची अध्यापनातील रुची वाढावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमही राबविले आहेत.
तसेच विविध दैनिकांमध्ये विविध विषयांवर त्यांचे ८६० हून अधिक लेख प्रकाशित झाले असून, त्यांनी अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्यानेही दिली आहेत.
‘विवेक वाणी’ आणि पुस्तक प्रकाशनाचा मनोदय
आगामी काळात लिखित ‘विवेक विचार’ संदेशासोबतच ‘विवेक वाणी’ या ध्वनिमुद्रित संदेशांच्या माध्यमातूनही स्वामी विवेकानंदांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा मानस प्रा. अमोल अहिरे यांनी व्यक्त केला.
याशिवाय आतापर्यंत प्रसारित केलेल्या संदेशांचे संकलन करून त्याचे पुस्तक प्रकाशित करण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रा. अमोल अहिरे म्हणाले…
«“विवेकानंदांच्या प्रेरणादायी आणि राष्ट्रनिर्माणाच्या विचारांनी महाविद्यालयीन जीवनापासून मी भारावून गेलो होतो. विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी मला एक चांगले व्यासपीठ मिळाले. या विचारांचे अनुसरण करत वाटचाल करावी आणि या जाज्वल्य विचारांचा प्रचार व प्रसार करावा, या ध्येयाने मी कामाला सुरुवात केली.”»
«“या संपूर्ण कार्यामध्ये माझी भूमिका केवळ पोस्टमनची, म्हणजेच विचारदूताची आहे. विवेकानंदांचे विचार विविध माध्यमांतून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम मी करत आहे. हे वैचारिक अग्निहोत्र प्रत्येकाच्या हृदयात सतत तेवत राहावे आणि ते कृतीत उतरावे, यासाठी आगामी काळात विशेष प्रयत्न करणार आहे.”»
– प्रा. अमोल अहिरे, नाशिक