अंबड लिंक रोडवर स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा फटका; ट्रक मालकाचे १५ हजारांचे नुकसान
नाशिक प्रतिनिधी: स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत अंबड लिंक रोड भागात सुरू असलेल्या संथ आणि निष्काळजी खोदकामाचा मोठा फटका स्थानिक वाहतूक व्यवसायिकांना बसला आहे. रस्त्यावर करण्यात आलेल्या अपूर्ण व असुरक्षित खोदकामामुळे एका स्थानिक ट्रक व्यावसायिकाच्या गाडीचे मोठे अपघाती नुकसान झाले असून, यामुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे बॅरिकेट्स न लावल्याने ही दुर्घटना घडली. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना संबंधित ट्रक मालकाने प्रशासनाच्या कारभाराचा जाहीर निषेध केला. गाडी मालक म्हणाले,
“प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे आज आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आमची भरलेली गाडी फक्त ७ हजार रुपयांच्या ट्रिपसाठी जात होती. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गाडीचे इतके नुकसान झाले आहे की तिच्या दुरुस्तीसाठी तब्बल १५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. कमावण्यापेक्षा खिशातून पैसे भरण्याची वेळ आमच्यावर आली असून या नुकसानाला प्रशासनच जबाबदार आहे.”
रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर ते मातीने नुसते पोकळ न भरता योग्य पद्धतीने रोलर फिरवून कडक (कंपॅक्ट) करण्याची तातडीची उपाययोजना करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी स्थानिकांनी केली आहे. रस्ता खाली पोकळ राहिल्याने त्यावरून एखादे अवजड वाहन गेल्यावर ते थेट खाली धसते आणि मोठी दुर्घटना घडते.
स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारांनी हे पोकळ भाग त्वरित व्यवस्थित बुजवून मजबूत करावेत आणि नुकसानग्रस्त ट्रक मालकाला भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक व्यावसायिकांकडून केली जात आहे.