खड्डे अन् चिखलाने घेतला आणखी एक बळी! सातपूर-अंबड लिंकरोडवर दुचाकीस्वाराचा ट्रकखाली मृत्यू
नाशिक | प्रतिनिधी | दि. २६ ऑगस्ट २०२६
सातपूर-अंबड लिंकरोडवरील खड्डे आणि चिखलाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना या मार्गावर आणखी एका जीवाचा बळी गेला आहे. चुंचाळे फाट्याजवळ रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ५४ वर्षीय पेंटरचा मृत्यू झाला. सुनील दादाजी बोरसे (वय ५४, रा. अशोकनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मंगळवारी (दि. २५) दुपारी सुमारे एकच्या सुमारास सुनील बोरसे हे ईश्वर जगताप (वय ४०, रा. श्रमिकनगर) यांच्या दुचाकीवरून एक्स्लो पॉइंटच्या दिशेने जात होते. चुंचाळे फाट्याजवळून जात असताना रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे दुचाकीचा ताबा सुटला आणि दोघेही खाली पडले.
याचवेळी बाजूने जात असलेल्या एमएच १४ ईएम ७९७७ क्रमांकाच्या ट्रकच्या मागील चाकाखाली सुनील बोरसे आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुचाकीचालक ईश्वर जगताप या अपघातातून बचावले.
खड्डे, चिखल अन् अपघातांची मालिका
सातपूर-अंबड लिंकरोडवरील रस्त्याची अवस्था गेल्या काही दिवसांपासून नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी, चिखल आणि गाळ साचला असून दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिनाभरात या मार्गावर विविध ठिकाणी गंभीर अपघात झाले आहेत. पपया नर्सरीजवळ, संजीवनगर, प्रणय स्टॅम्पिंग कंपनी परिसर आणि आता चुंचाळे फाटा अशा ठिकाणी अपघात झाल्याचे नागरिक सांगतात. या कालावधीत अनेक नागरिक जखमी झाल्याचाही दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
अपघातानंतरही रस्त्याची समस्या कायम
चुंचाळे फाट्याजवळील दुर्घटनेनंतरही रस्त्यावरील चिखल आणि गाळाचा प्रश्न तातडीने दूर झाला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
“आधी अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना करा; जीव गेल्यानंतर रस्ता दुरुस्त करण्याची वेळ येऊ नये,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून संबंधित यंत्रणेने तातडीने खड्डे बुजवून चिखल हटवावा, अशी मागणी होत आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सुनील बोरसे हे पेंटर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हिरावला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अशोकनगर आणि श्रमिकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खड्डे अन् चिखलाने घेतला आणखी एक बळी! सातपूर-अंबड लिंकरोडवर दुचाकीस्वाराचा ट्रकखाली मृत्यू
