सिटी लिंक मध्ये नोकरीचे आमिष; ९ जणांची १८ लाख फसवणूक
महिलेला लाखो रुपयांना गंडा
नाशिक प्रतिनिधी/ नाशिक महानगर पालिकेत तसेच सिटी लिंकमध्ये नोकरीस लावून देण्याच्या आमिषाने दोन घटनांमध्ये १८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पहिल्या प्रकारात महिलेची महापालिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने १४ लाखांची तर दुसऱ्या घटनेत सिटी लिंकमध्ये लाइन चेकिंगपदी नोकरी देण्याच्या बहाण्याने ८ व्यक्तींची ४ लाख ५ हजारांची फसवणूक केल्याचा व नोकरी लागल्यानंतर खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली आणि मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी शशिकांत शेवाळे (३८, रा. पेठरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे आई, वडील, भाऊ, बहीण, भावजयी अशा पाच व्यक्तींनी त्यांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. महापालिकेत कार्यरत असलेल्या रोहिदास लक्ष्मण दिपक यांनी आपल्या जागेवर मुलगी मीनाक्षी हिला नोकरीला लावून देणार असल्याचे सांगितले. मात्र, २०१९ पासून आजपर्यंत नोकरीस लावून दिले नाही म्हणून मीनाक्षी यांनी रोहिदास यांसह त्यांच्या कुटुंबातील ५ जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी वेळोवेळी असे ५ वर्षांत एकूण १४ लाख रुपये घेतल्याचे म्हटले आहे. त्यानुसार भद्रकाली पोलिस तपास करत आहेत.
नोकरीसाठी खंडणीचा तिघांवर गुन्हा
महामंडळाच्या सिटी लिंक बससेवेत लाइन चेकिंगपदाची नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आठ जणांना चार लाख ५ हजार रुपयांची वसुली करणाऱ्या तिघां विरोधात मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर भोये, राजेश वाघ व सुरेश भदाणे यांनी संगनमत करून सुनील पांडुरंग कोल्हे (रा. बोरगड, म्हसरुळ) यांच्यासह आठ जणांना नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले. नोकरीस लावल्यानंतर डिसेंबर २०२३ पर्यंत ३० हजार रुपये फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध, तर इतर सहा जणांकडून १ लाख ४ हजार ३०० रुपये घेतले. त्याचप्रमाणे १५ जून २०२२ ते २५ मार्च २०२५ दरम्यान शरणपूररोड येथील सिटी लिंकच्या कार्यालयात जातिवाचक बोलून केल्याचे म्हटले आहे.