नाशिक (प्रतिनिधी): बनावट चलन हे प्रत्येक देशासमोर असलेले मोठे आर्थिक संकट आहे. बनावट नोटांचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी शहिद कपूर आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या फर्जी या वेब सिरीजने बनावट चलन प्रकरणावर प्रकाश टाकला होता. याद्वारे हे प्रकरण किती गंभीर आहे, याचा अंदाज लोकांना आला.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची धामधूम संपताच नाशिकमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये मंगळवारी (दि. २८) अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५०० रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणा-या तीन संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केल्यानंतर बुधवारी (दि. २९) पुन्हा नाशिकरोड येथे बनावट नोटा बाळगणा-या दोन महिलांना गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले. या दोन दिवसांच्या कारवाईत पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २५ हजार रुपये जप्त केले आहेत. नाशिकमध्ये बनावट नोटा छापणा-यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून, या प्रकरणाचे धागेदोरे आता कुठपर्यंत जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाशिक मतदारसंघातील लोकसभा निवडणूक झाल्यानंतर बनावट नोटा चलनात येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. सिन्नर येथून नोटा छापून त्या नवीन नाशिक भागात विक्रीसाठी आलेल्या त्रिकुटास अंबड पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या कडून ५०० रुपयांच्या ३० बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक अण्णा पगार (वय ४५, रा. मेंढी, ता. सिन्नर) भारतीय चलनाच्या ५०० रुपये किमतीच्या ३० बनावट नोटा विक्री करण्यासाठी मंगळवारी (दि. २८) पहाटे ३ वाजेच्या सुमारास डीजीपी नगरमधील माउली लॉन्स येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, तो भारतीय चलनाच्या बनावट नोटा बाळगताना, तसेच वितरित करताना मिळून आला.
अंबड परिसरातील बनावट नोटांचे हे प्रकरण समोर आले असतानाच उपनगर परिसरात बनावट नोटा बाळगणा-या दोन महिलांना पोलिसांनी बुधवारी (दि. २९) ताब्यात घेतले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पूजा कहाणे (रा. जेलरोड) यांना स्वाती अहिरे या महिलेने पाच-सहा दिवसांपूर्वी १० हजार रुपये दिले होते. यामध्ये ५०० रुपयांच्या २० नोटा होत्या. मात्र, या नोटा बनावटसदृश असून, बनावट नोटा देण्यासाठी स्वाती अहिरे कहाणेला भेटण्यााठी मुक्तिधामच्या मागील बाजूस येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे गुंडा विरोधी पथकातील अंमलदार व गुन्हे शाखा विभाग २ कडील कर्मचा-यांनी मुक्तिधाम मंदिर परिसरात सापळा रचला असता, स्वाती अहिरे हिने पूजाकडे दिलेले पैसे परत मागितले. या बनावट नोटांची माहिती कोणालाही देऊ नको अशी सूचना केली. याच दरम्यान पूजा कहाणे हिने आपल्याकडील बनावट नोटांची पिशवी स्वातीला दिली. त्याचवेळी गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी त्या दोन्ही महिलांना अटकाव करीत, नोटांच्या पिशवीची तपासणी केली असता, पिशवीत बनावट नोटा असल्याचे समोर आले. याप्रकरणी दोन्ही महिलांविरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..