त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी / : कपडे धुण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय दोन मुलींचा त्र्यंबकेश्वर येथील कासारबारी परिसरातील त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या बिल्वतीर्थ तलावात बुडून मृत्यू झाला. शनिवारी (दि. ८) दुपारी बाराच्या सुमारात घडलेल्या या घटनेत तनुजा युवराज कोरडे व अर्चना बाळू धनगर (दोघीही रा.चौकीमाथा) यांचा अंत झाला. सदर घटनेमुळे परिसरात हळहळू व्यक्त केली जात आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात सध्या नगरपरिषदेकडून दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यातून, अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहे. तनुजा व अर्चना शनिवारी दुपारी कपडे धुण्यासाठी येथील निल पर्वतच्या पाठीमागे असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बिल्वतीर्थ तलावावर गेल्या होत्या. कपडे धुत असताना दगडावरुन पाय घसरल्याने अर्चना तोल जाऊन ती पाण्यात पडली. त्यामुळे तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तनुजा देखील पाण्यात पडली. सदर घटनेविषयी समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे पाऊणतास शोधकार्य केल्यानंतर मुली पाण्यात आढळून आल्या. त्यांना बाहेर काढत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ. वर्षा वर्षे व डॉ. ऋषभ आकरे यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात नोंद करण्यात आली आहे.