लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी दूर करून अनुदान खात्यावर वर्ग करा –

लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी दूर करून अनुदान खात्यावर वर्ग करा
माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
————————-
सटाणा प्रतिनिधी :/ – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवरील लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणीमुळे सटाणा शहरातील अनेक शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून आणि १२ व्या हप्त्यापासून केंद्र शासनाच्या पीएम किसान व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेपासून वंचित आहेत. लॅन्ड सिडींगची तांत्रिक अडचण दूर करून वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर योजनांचा हप्ता वर्ग करावा, या मागणीसाठी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान, यासंदर्भात आपण तत्काळ अहवाल मागवून घेणार असून लवकरच राज्याच्या कृषी आयुक्तांना प्रस्ताव सादर करून याप्रश्नी तोडगा काढणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी शिष्टमंडळाला दिले.
जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात झालेल्या चर्चेत बोलताना माजी आमदार श्री.चव्हाण म्हणाले, शहरातील तब्बल २५० शेतकरी बांधव सप्टेंबर २०२२ पासून आणि १२ व्या हप्त्यापासून केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान (पी.एम. किसान) व राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असल्याने त्यांना या दोन्ही योजनांचे हप्ते मिळत नाहीत. या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मात्र लँड सिडींग कारणामुळे या दोन्ही योजनांचा लाभ देता येत नसल्याचे कारण अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा आजपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना पी.एम. किसान व नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत अद्याप हप्ते मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाबद्दल असंतोष वाढत आहे. याचा गांभीर्याने विचार करून लॅन्ड सिडींगची तांत्रिक अडचण दूर करावी आणि शेतकऱ्यांना योजनांचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही श्री.चव्हाण यांनी जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांच्याकडे केली. दरम्यान, याबाबत विभागीय आयुक्त प्रवीम गेडाम यांनाही निवेदन देण्यात आले आहे. शिष्टमंडळात राजेंद्र सोनवणे, मोरेनगरचे सरपंच बाळासाहेब देवरे, नंदकिशोर सोनवणे, राजेंद्र पाटील, आशिष सोनवणे, विलास सोनवणे, जयवंत सोनवणे, ललित सोनवणे, संजय सोनवणे, शांताराम सोनवणे, दिलीप सोनवणे, दगडू सोनवणे आदि शेतकरी सहभागी होते.

चौकट :
…तर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा!
वारंवार तक्रारी करूनही लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत शासनस्तरावरून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तालुकास्तरावरून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर संबंधित शेतकर्‍यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली आहे. आता यानंतरही दोन्ही योजनांचा लाभ मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया :
1. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सर्व शेतकरी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अधिकारी व कर्मचारी आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. जिल्हाधिकार्‍यांच्या आश्वासनानंतरही लँड सिडिंगची समस्या मार्गी लागून आम्हाला न्याय मिळाला नाही, तर नाइलाजाने आम्हा शेतकर्‍यांना आंदोलन करावे लागेल.
– राजेंद्र सोनवणे, शेतकरी

2. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उदात्त हेतूने केंद्र व राज्य सरकारने पी.एम. किसान व नमो शेतकरी सन्मान योजना सुरु केल्या असून त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, परंतु लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी व इतर कारणांमुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून अद्याप वंचित आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
– संजय चव्हाण, माजी आमदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *