दिलीप बोरसे यांनी ठेकेदार व अधिकारी वर्गाला धरले धारेवर,दहा दिवसांत काम पुर्ण करण्याच्या दिल्या सुचना
प्रतिनिधी सटाणा /: तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ताहाराबाद येथील मोसम नदीवरील पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असताना आमदार दिलीप बोरसे यांनी रविवारी(दि.३०) सकाळच्या सुमारास अचानक कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी आमदार बोरसे यांनी रुद्रावतार धारण करीत ठेकेदार व अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली असून येत्या दहा दिवसात काम पूर्ण झाल्यास पुढील परिणामास सामोरे जावे लागेल,असा गर्भित इशाराही दिला आहे.साहजिकच एरवी शांत व संयमी मानल्या जाणाऱ्या आमदार बोरसे यांचा हा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला असून परिसरातील जनतेने मात्र याबाबत समाधान व्यक्त करीत हे काम तातडीने मार्गी लागावे,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या पार्श्वभूमीवर ताहाराबाद येथील मोसम नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाच्या ठिकाणी पर्यायी पुलाचे काम सुरू आहे.गेल्या दीड महिन्यापासून यामुळे पूर्वीच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.परंतु त्यामुळे मात्र अवजड वाहतूक,एसटी बसेस व अन्य वाहनधारकांची प्रचंड कुचंबणा होत असून त्यांच्याकडून पर्यायी मार्गाचा वापर केला जात आहे.त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील ताहाराबाद अंतापुर मांगीतुंगी फाटा,ताहाराबाद सोमपूर भडाणे पिंपळकोठे मांगीतुंगी फाटा व ताहाराबाद सोमपूर दरेगाव मांगीतुंगी फाटा या प्रमुख तीन ग्रामीण मार्गांचा वापर केला जात असून अल्पावधीतच त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.अवजड वाहतुकीमुळे या ग्रामीण मार्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.दुसरीकडे या मार्गावरून परिसरातील विद्यार्थ्यांची होणारी ने आणही बंद झाल्यामुळे पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे याबाबत जनतेमधून जोरदार मागणी होत आहे.धिम्या गतीने सुरू असलेल्या कामाबाबत तीव्र असंतोष व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर जनतेच्या भावनांची दखल घेत आमदार दिलीप बोरसे यांनी रविवारी(दि.३०) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक या कामाच्या ठिकाणी भेट दिली.कामाबाबत माहिती घेतानाच प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकारी व ठेकेदारास पाचारण केले.यावेळी आमदार बोरसे यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.इतर ठिकाणी अशा स्वरूपाची कामे दहा दिवसात पूर्ण होत असताना या ठिकाणी दीड महिना उलटूनही काम होत नसल्याने तुम्ही झोपा काढतात का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत येत्या दहा दिवसात काम पूर्ण न झाल्यास होणाऱ्या परिणामास तोंड द्यावे लागेल असा गर्भित इशाराही आमदार बोरसे यांनी दिला. साहजिकच आमदार बोरसे यांचा हा रुद्रावतार बघून अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले.आमदार बोरसे यांनी आक्रमक पावित्रा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल्याने याबाबत जनतेमधून मात्र समाधान व्यक्त होत असून पुलाचे काम तातडीने पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आता निर्माण झाली आहे.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय भामरे,शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सुभाष नंदन,नामपुर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब भामरे, नामपुर बाजार समिती संचालक पंकज भामरे,भडाणे सरपंच अरुण भामरे, आखतवाडे सरपंच अशोक खैरनार, ताहाराबाद उपसरपंच जीवन माळी,डॉ.उदय निकम,निखिल कासारे,सचिन कोठावदे,सुरेश महाजन,योगेश नंदन,मुकेश साळवे,गोविंद खैरनार,रवी मानकर,राजेश माळी,नितीन घरटे आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.