नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयात भामट्या महिलेने पाच दिवसांचे बाळ चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बाळ चोरीला गेल्याचे लक्षात येताच आईने टाहो फोडला.
मूळची मध्यप्रदेश येथील व हल्ली ठेंगोडा (ता. सटाणा) येथे वास्तव्यास असलेल्या सुमन अब्दूल मोहम्मद कलीम (वय २३) हिला तिचा पती अब्दूल कलीम यांनी दि.२८ डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दुस-या दिवशी शस्त्रक्रियेनंतर तिचे बाळंतपण झाले. गोंडस मुलगा जन्मास आल्याने या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला खरा; परंतु, त्यास दृष्ट लागली!
प्रसूतीनंतर बाळ आणि मातेला पीएनसी वॉर्डात हलविण्यात आले. या वॉर्डात एक महिला गेल्या सात-आठ दिवसांपासून तोंडास रूमाल बांधून येत असे. बाळासह आईची विचारपूस करून नातेवाईक असल्याचे भासवत ती बाळाचा तासन्तास सांभाळ करीत असे. त्यामुळे या दाम्पत्याचा तिच्यावर विश्वास बसला आणि रुग्णालयीन कर्मचाºयांसह कुणीही तिला टोकले नाही. शनिवारी (दि. ४) सकाळी १० च्या सुमारास कर्मचाºयांकडून सुमनला डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत होती. याचवेळी नेहमीप्रमाणे रूमालाने तोंड बांधून येणारी महिला तेथे गॉगल लावून आली. आज डिस्चार्ज होत असल्याचे सुमनने तिला सांगितले. त्यानंतर अब्दूल कलीम गोळ्या औषधे घेण्यासाठी गेल्याची संधी साधत, ‘तुझ्या पतीने बाळास घेऊन बोलावले असून, तू नंतर नर्स देईल ते कागद घ्ेऊन प्रवेशद्वाराजवळ ये’ असे महिलेने तिला सांगितले. भोळ्याभाबड्या सुमनने तिच्यावर विश्वास ठेवत, या अज्ञात महिलेकडे बाळ सोपविले. त्यानंतर ती महिला तेथून तत्काळ पसार झाली. अल्पावधीतच पती तेथे पोहोचल्याने या घटनेचा भंडाफोड झाला. येथे रोज येणारी ताई बाळास घेऊन गेल्याचे सुमनने सांगितल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. या महिलेने बाळ पळविल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने टाहो फोडला. कर्मचाºयांसह सुरक्षा रक्षकानी परिसर पिंजून काढला; मात्र बाळाला घेऊन पळालेली महिला हाती लागली नाही.
यावेळी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त सचिन बारी व सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आपल्या फौजफाट्यासह धाव घेतली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी माहिती घेत वॉर्डासह रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली. मात्र, हा तपास कुचकामी ठरला. आवार आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेत चिमुकल्यास पळविणारी महिला कैद झाली असून, तिचा शोध सुरू आहे.