लाचखोरीची कीड.. एकाच दिवसात सहा लाचखोर जाळ्यात
नाशिक प्रतिनिधि /: अजय खरात – नाशिक शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरात लाचखोरीची कीड वाढत चालली आहे. एकाच दिवशी तब्बल सहा लाचखोरांना जाळ्यात अडकवण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आल आहे.
इगतपुरी येथील ग्रामसेविकेस 30 हजार, नगरसूल येथील तलाठ्यास 1 हजार, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील तलाठी व त्याच्या दोन खासगी पंटरला 5 हजार आणि नंदुरबार येथील तळोदामधील खासगी व्यक्तीस 700 रुपयांची लाच घेताना विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
जळगाव येथील मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे याच्यासह अरुण शालिग्राम भोलानकार व संतोष प्रकाश उबरकर या दोन खासगी व्यक्तींना तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच घेताना विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांनी तक्रारदाराच्या नातलगांचे शेतीच्या सात बारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील तक्रारदाराने शेतीवर वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालयात फेरफार नोंदी व इतर शासकीय कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी खासगी व्यक्ती राजेंद्र कुमार नारायण क्षत्रीय याने तक्रारदाराकडे 800 रुपयांची
लाच मागत तडजोड करीत 700 रुपयांची लाच स्विकारली. या कारवाई विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
भरवजची ग्रामसेविका लाच घेताना जाळ्यात
घोटी: आदिवासी जमीन बिगर आदिवासी करण्याच्या प्रक्रियेचा ठराव देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भरवज येथील ग्रामसेविका सुवर्णा छगन आहेर (39) यांना जमीन खरेदी-विक्री एजंट तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार हे शेती व जमीन खरेदी विक्री खाजगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्यांचे मित्र मिळून त्यांनी आदिवासी जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे अर्ज सादर केला होता. या प्रकरणाच्या चौकशी अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय, भरवज (ता.इगतपुरी) यांना आदिवासी व्यक्ती ते बिगर आदिवासी प्रकरणामध्ये
ग्रामपंचायतचा ठराव घेण्याचा आदेश इगतपुरी तहसीलदारांनी दिला होता. त्यानुसार तक्रारदार हे सदर ठरावाबाबत भरवज ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक सुवर्णा आहेर यांनी तक्रारदाराकडे ठराव देण्याचा मोबदल्यात वीस हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्विकारली. आहेर यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ग्रामसेविकेस एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संदीप हांडगे, सुरेश चव्हाण, राजश्री अहिरराव संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.