नाशिक प्रतिनिधी /: नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री कदम यांनी मंगळवारी (ता. २८) नाशिक पोलिस आयुक्तालयाचा आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला असता त्यानी नाशिकमधील गुन्हेगारीला रोखण्यासाठी कायदा व सुव्यवस्था कायम अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आणि त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस विभागाला दिले. अल्पवयीनांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले असून, अमली पदार्थमुक्त महाराष्ट्रासाठी मोहीम राबविण्यात येईल. नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, सुरक्षित कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द त्यांनी त्यावेळेस दिला. नाशिक शहराचा विस्तार आणि विकास हा होत आहे. शहराच्या वाढत्या विस्तारासोबत कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखणे गरजेचे आहे.
भविष्याचा विचार करता शासनाकडे प्रलंबित असलेल्या पोलिस आयुक्तालय हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल असे त्यावेळेस ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम ठरवून दिला आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नाशिकमध्ये गेल्या आठ महिन्यांत चेन स्नॅचिंगच्या २५० घटना घडल्या. त्यामध्ये दोन गँगवर पोलिसांनी कारवाई केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात पोलिसांनी ज्याप्रकारे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या त्यांनी कौतुक केले.