घातपाताच्या संशयावर अखेर पडदा… बहुचर्चित डॉ. सुवर्ण वाजे मृत्यू प्रकरणी पती संदीप वाजे निर्दोष

घातपाताच्या संशयावर अखेर पडदा… बहुचर्चित डॉ. सुवर्ण वाजे मृत्यू प्रकरणी पती संदीप वाजे निर्दोष

नाशिक : महापालिकेच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहुचर्चित मृत्यू प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात दोन दिवस चाललेल्या अंतिम सुनावणीअंती त्यांचे पती संशयित संदीप महादू वाजे (४२) व त्यांचा मावसभाऊ संशयित बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के (५१) यांची सबळ पुराव्यांअभावी न्यायाधीश रूपेश राठी यांच्या न्यायालयाने सोमवारी (दि.१०) निर्दोष मुक्तता केली. तसेच न्यायालयाने ग्रामीण पोलिसांच्या तपासावर देखील ताशेरे ओढले आहेत.

सिडको येथील मनपाच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत तत्कालीन वैद्यकीय अधिकारी सुवर्णा संदीप वाजे (३८) या २५ जानेवारी २०२२ साली बेपत्ता झाल्या होत्या. यामुळे त्याच रात्री याप्रकरणी संदीप वाजे यांनी अंबड पोलिस ठाण्यात पत्नी सुवर्णा वाजे बेपत्ता झाल्याची तक्रारदेखील दिली होती. विल्होळीजवळच्या रायगडनगर येथे लष्कराच्या हद्दीच्या प्रवेशद्वार क्रमांक ३६ समोर वाडीव-हे पोलिसांना २६ जानेवारी रोजी एक कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. ती कार (एमएच १५ डीसी ३८३२) वाजे यांची असल्याचे तपासात पुढे आले होते. मोटारीत आढळून आलेल्या मानवी हाडांचा डीएनएन हा सुवर्णा वाजेंचा असल्याचेही प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले होते. यासाठी पोलिसांनी वाजे यांच्या वडिलांचे डीएनएन नमुने घेतले होते. हे नमुने जुळले होते. पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलहामुळे वाजे यांनी पत्नीचा खून केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

—-

२१ साक्षीदारांची साक्ष..

न्यायालयाने वाजे यांना या प्रकरणात सुरुवातीला चौदा दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. याप्रकरणी वाडीव-हे पोलिस व ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत ही कारवाई केली होती. यावेळी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या माहेरच्या नातेवाइकांचाही जबाब नोंदविण्यात आला होता. दरम्यान, सरकार पक्षाकडून न्यायालयात २१ साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी सबळ पुरावे या गुन्ह्यात सरकार पक्षाला सादर करता आले नाही. यामुळे संशयित वाजे व म्हस्के यांची या गुन्ह्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, अशी माहिती त्यांचे वकील राहुल कासलीवाल यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *