नाशिक |प्रतिनिधी / दि. ८ मे २०२६
टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणात फरार असलेल्या निदा खान हिला नाशिक पोलिसांनी अखेर अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवारी सायंकाळी तिला ताब्यात घेण्यात आले. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाने छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली.
सुमारे महिनाभर पोलिसांना चकवा देणारी निदा खान नारेगाव परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती तांत्रिक तपासातून समोर आली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिस तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. योग्य संधी साधत संयुक्त पथकाने छापा टाकून तिला ताब्यात घेतले.
यापूर्वी नाशिकरोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. गर्भवती असल्याच्या कारणावरून जामीन देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ती मान्य केली नाही.
पीडित युवतीच्या तक्रारीनंतर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात निदा खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली होती.
तपासादरम्यान आरोपीकडून पीडितेला धर्मांतरासंदर्भातील व्हिडीओ पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. फरार असताना ती भिवंडी, मुंब्रा आणि मुंबई येथे थांबल्याची माहिती तपासात उघड झाली असून, गेल्या काही दिवसांपासून ती छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले.
निदा खानला शुक्रवारी नाशिकमध्ये आणून वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
