व्यापाऱ्यास १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
नाशिक:/ दीड वर्षांपूर्वीच नाशिकमध्ये वस्तू आणि सेवाकराच्या बिलांमध्ये फेरफार करून सुमारे १०० कोटी रुपयाचा घोटाळा उघड झाला होता. आता पुन्हा तशाच पद्धतीने कोणत्याही प्रकारची वजावट केलेली नसताना इनपुट टॅक्स क्रेडिट घेत शासनाची २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार राय यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वस्तू व सेवाकर कार्यालयात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मेसर्स हरी ओम इंजिनिअरिंग, मेसर्स हरी ओम सर्व्हिसेस, मेसर्स पुरुषोत्तम इंजिनिअरिंग, मेसर्स रेनबो डेको प्लास प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स हरिओम उद्योग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स हरी ओम एजन्सी यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही बिल तसेच वस्तू आणि सेवांच्या प्रत्यक्ष पावतीशिवाय आयटीसीचा जास्तीचा आणि गैरवापर केल्याच्या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरेंद्र कुमार रामनारायण राय हे मेसर्स रेनबो डेको प्लास प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स हरिओम उद्योग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक आणि मेसर्स हरिओम इंजिनिअरिंगमध्ये मालक आहेत.
सर्व कंपन्या सुरेंद्रकुमार रामनारायण राय आणि त्यांच्या भावाच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून कोणतेही बिल अथवा इनवॉईस पावती न देता या कंपन्यांनी कर भरताना इनपुट क्रेडिट घेत सरकारची फसवणूक केली. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्याच्या उद्देशाने जीएसटी अंतर्गत फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा वापर यासाठी करण्यात आला.
या सर्व घटनेत सुरेंद्र कुमार राय हे सूत्रधार असल्याचे सिद्ध झाले. या सहा कंपन्यांनी बनावट पावत्या सादर करत २५ कोटी २६ लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट वापरत कर भरताना शासनाची फसवणूक केल्याचे या तपासणीत दिसून आल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान, आरोपीला मुख्य न्यायाधिकरणाच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून अशाच प्रकारची आणखी काही फसवणूक आहे का याची तपासणी केली जाते आहे.