नाशिक : माहेरहून पैसे, वाहन, दागिने आणि इतर मागण्या पूर्ण न केल्याने विवाहित महिलांचा छळ केल्याच्या पाच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अंबड, एमआयडीसी, सातपूर आणि उपनगर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारहाण, मानसिक छळ, चारित्र्यावर संशय, स्त्रीधन हिसकावून घेणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती, सासू, सासरे आणि नणंद यांनी एकलहरे रोडवरील खर्जुल मळा तसेच पिंपरी-चिंचवड येथे वास्तव्यास असताना तिचा छळ केला. शिवीगाळ, मारहाण तसेच आईची सोन्याची पोत तोडून नांदविण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास हवालदार महाजन करीत आहेत.
एमआयडीसी परिसरातील दुसऱ्या प्रकरणात, माहेरून १५ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून विवाहितेचा छळ करण्यात आल्याची तक्रार आहे. मोबाइल फोडणे, मारहाण करणे, स्त्रीधन काढून घेणे आणि घराबाहेर काढणे अशा प्रकारांचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक दिलीप भंडे तपास करीत आहेत. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिकनगर परिसरातील एका विवाहितेने घर बांधण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत तसेच पतीला बुलेट मोटारसायकल घेऊन द्यावी, या मागणीसाठी दीड वर्षांपासून छळ झाल्याची तक्रार केली आहे. मारहाण करून स्त्रीधन काढून घेतल्याचा आणि घराबाहेर काढल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याच परिसरातील आणखी एका विवाहितेने पती व सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार नोंदवली आहे. सुरत आणि पुणे येथे वास्तव्यास असताना हा छळ झाल्याचा आरोप असून २००२ पासून त्रास सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास हवालदार बनकर आणि जमादार आहेर करीत आहेत. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहितेने सन २००९ पासून माहेरून पैसे आणण्याच्या मागणीसाठी छळ सुरू असल्याची तक्रार दिली आहे. घरगुती कारणांवरून वाद निर्माण करून मारहाण करणे, चारित्र्यावर संशय घेणे तसेच पीडिता आणि तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार सांगळे करीत आहेत.
हुंडाबळीविरोधी कायद्याची कठोर तरतूद
हुंड्यासाठी छळ, मारहाण किंवा विवाहितेवर मानसिक अत्याचार करणे हा गंभीर गुन्हा असून भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार दोषींवर कारवाईची तरतूद आहे. पोलिसांनी सर्व प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.
