सिडको भागात पुन्हा खून, दारूच्या नशेत धुंद असलेल्या एकाने लाकडी दांडक्याने वार करत दुसऱ्याला संपवलं;
प्रतिनिधी:/ अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्ती चौक परिसरातील दत्त मंदिर बसस्टॉपजवळील देशी दारू दुकानासमोर आज रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीचा लाकडी दांडका डोक्यात मारून खून करण्यात आला.
गणपत घारे राहणार (वय वर्षे 50, उंटवाडी, नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणात समोद कौर (35) या इसमाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणपत घारे आणि समोद कौर हे दोघेही एका देशी दारू दुकानासमोर बसून दारू पित होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. बाचाबाचीचा सूर चढत गेल्यानंतर समोद कौर याने जवळच असलेल्या लाकडी दांडक्याने गणपत घारे यांच्या डोक्यात जोरात वार केला. या गंभीर मारामुळे गणपत घारे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. आरोपी समोद कौर याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडताना दोघेही पूर्णपणे दारूच्या नशेत होते. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.