पत्रकार संघटना आक्रमक.. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पत्रकार संघटना आक्रमक..

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मात्र संरक्षण कायदा कागदावरच?

नाशिक प्रतिनिधी /: सिंहस्थ कुंभमेळा बैठकीच्या वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्‍वर येथे गेलेल्या दूरचित्रवाणी पत्रकारांवर वाहन व प्रवेश शुल्क वसुली करणाऱ्या गाव गुंडांनी हल्ला केला. या घटनेमुळे पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नाशिक प्रेस क्लब व नाशिक शहर पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच त्र्यंबकेश्‍वरमधील प्रवेश व वाहन शुल्क तातडीने रद्द करावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांवर सकारात्मकता दर्शवत दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्वाही यावेळी दिली.

पत्रकार संघटनांनी दिलेल्या निवेदनात प्रवेश शुल्क वसुलीच्या कंत्राटात घोटाळ्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. आगामी सिंहस्थात भाविकांची लूट होण्याची शक्यता टाळण्यासाठी टोल, पार्किंग, स्वच्छता आदी कंत्राटांवरील नियुक्त कर्मचाऱ्यांची काटेकोर तपासणी व्हावी, असेही नमूद करण्यात आले.

याप्रसंगी ‘सकाळ’चे अभय सुपेकर, ‘दिव्य मराठी’चे जयप्रकाश पवार व दीप्ती राऊत, ‘देशदूत’चे शैलेंद्र तनपुरे, ‘लोकमत’चे अभिजित कुलकर्णी, ‘पुण्यनगरी’चे किरण लोखंडे, ‘पुढारी’चे राहुल रनाळकर, नाशिक पत्रकार संघ अध्यक्ष संपत देवगिरे यांच्यासह वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांसाठी कार्यशाळेचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियोजन..

जिल्हाधिकारी शर्मा यांनी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पत्रकार व शासकीय यंत्रणांची संयुक्त कार्यशाळा घेण्याची माहिती दिली. या कार्यशाळेत पत्रकारांचे हक्क, अधिकार आणि सुरक्षा यंत्रणांना समजावून सांगितले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *