मध्यरात्री चार वाहनांची सातपुरला जाळपोळ!

सातपूर (प्रतिनीधी): मध्यरात्रीच्या सुमारास चार वाहनांची जाळपोळ झाल्याचा प्रकार सातपूर येथील जाधव संकुल परिसरात शनिवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आला. जाधव संकुल परिसरातील कातकाडेनगर येथील डी. एड. कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या गॅरेजच्या बाहेरील चार दुचाकी जाळण्यात आल्या. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून, संशयित हा मनोरुग्ण असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी.एड. कॉलेज बिल्डिंगमध्ये मातोश्री नावाचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या चार टू व्हीलर रात्रीच्या वेळी गॅरेज बाहेर उभ्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात युवकाने ही वाहने जाळली. सकाळी ही घटना उघडकीस आली. सामाजिक कार्यकर्ते सीए मनोज तांबे, अरुण घुगे, नाना वाघ, रवींद्र देवरे, किरण कोठावदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना खबर दिली. त्यानंतर सातपूर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे हवालदार दीपक खरपाडे, अंमलदार तुषार देसले यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी मच्छिंद्र गरुड या संशयितास ताब्यात घेतले आहे. मच्छिंद्र हा मनोरुग्ण असल्याचे त्याच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी सांगितले. यापूर्वीही त्याने अनेक कारनामे केले असल्याचे संजय राहाडे यांनी सांगितले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांना निवेदन देत संशयितास कायदेशीर धडा शिकवण्याची मागणी केली. यावेळी गोपाळ सैंदाने, संजय रहाडे, रमेश काळे, अक्षय गव्हाणे, दिलीप भुरके, प्रमोद शिंदे, सागर रोकडे, रामचंद्र मुसळे, शिवाजी धुमाळ, वैशाली देशमुख, ज्योती पांचवे, पुष्पा बुरके, एकनाथ गव्हाणे, लता अहिरे, सिंधू काठे, वर्षा सैंदाणे, सुनीता बेलेकर, अंजना पवार, दीपक तुपे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *