- निफाड ८.०, नाशिक १०.१, मालेगावचा पारा ११ अंशांवर
नाशिक :
नाशकात थंडीचा जोर वाढताच सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसत असून त्यात लहान मुले आणि वृद्धांचे प्रमाण अधिक जाणवत आहे. सर्दी, खोकल्यामुळे नागरिकांना कफाचा त्रास जाणवत आहे. बालमृत्यूच्या घटनेनंतर अनेक राज्यांनी काही कफ सिरपवर बंदी घातली आहे. तेव्हा लहान मुलांना गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला दिला जात आहे. लहान मुले वातावरणातील गारठा फारसा सहन करू शकत नाहीत. यामुळेच हिवाळ्यात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना ताप, खोकला, सर्दी, कफ असे आजार होतात. तेव्हा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
थंडीपासून बचावासाठी स्वेटर, मफलरचा वापर करावा. वातावरणातील बदलांमुळे शरीरातील हायड्रेशनची पातळी घसरते आणि थकवा जाणवू लागतो. घरातून बाहेर पडताना कायम मुलांसोबत पाण्याची बाटली नक्की द्यावी. पाण्यामध्ये आवळा आणि लिंबू घालून ते पाणी प्यावे. यामुळे मुलांच्या शरीरातील हायड्रेशनची पातळी वाढते, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
मुलांच्या शरीरातील पाणी कमी झाले हे ओळखण्याचे एकमेव साधन म्हणजे त्यांच्या लघवीचा रंग. अतिशय हलक्या, फिकट रंगाची लघवी होणे याचा अर्थ शरीराला आवश्यक तितके पुरेसे पाणी मिळत आहे. याउलट, गडद पिवळा रंग असेल तर पाण्याची कमतरता आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे. सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे साधे अन्न घ्यावे, पाणी गरम करून प्यावे. गरम पाण्याची वाफही परिणामकारक आहे.
गत आठवडाभरापासून नाशिक, निफाड व मालेगाव परिसरात तापमानाचा पारा घसरत आहे. रविवारी (दि. १६) नाशिक शहरात किमान १०.१, निफाडमध्ये ८.०, तर मालेगावी ११.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे निफाडचे तापमान हंगामातील नीचांकावर पोहोचले आहे. दरम्यान, आगामी तीन दिवसांत जिल्ह्यात थंडीच्या लाटेसह पावसाचाही इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यातच तीन दिवसांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गत आठवडाभरापासून गारठा जाणवू लागला आहे. निफाड, मालेगाव, नाशिक शहरामध्ये तापमान १० अंशांपेक्षा खाली घसरले आहे. उत्तरेकडून येणाºया वाºयांमुळे महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. हवामान विभागाने रविवारपासून पुढील तीन दिवसांसाठी नाशिकला थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.