महापालिका प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांना मिळवून दिला दिलासा!
नाशिक (प्रतिनिधी): सिडको विभागातील श्रीराम नगर, फडोळ मळा परिसरातील ‘सोहन रेसिडेन्सी’ आणि ‘अर्चित बिल्डिंग’ समोरील ड्रेनेजच्या गंभीर समस्येबाबत नगरसेवक शरद फडोळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेच्या चकरा मारूनही काम होत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी फडोळ यांच्याकडे साकडे घातले होते. त्यानंतर फडोळ यांनी तात्काळ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत ही समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.

श्रीराम नगर परिसरात अर्चित बिल्डिंगसमोरील पावसाळी लाईनचे चेंबर वाळूमिश्रित मातीने पूर्णपणे तुंबले आहे. गेल्या १५ दिवसांपासूनची परिस्थिती अत्यंत बिकट असून, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला की त्या दाबाने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहू लागते. यामुळे रस्ता खराब झाला असून परिसरात २४ तास पाण्याचा ओलावा राहत आहे. परिणामी, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी अंबड येथील विभागीय अधिकारी, आरोग्य विभाग आणि ड्रेनेज विभागाकडे वारंवार विनंती अर्ज केले होते. महापालिकेचे कर्मचारी व ट्रॅक्टर येऊन पाहणी करत, मात्र “येथे जेट मशीनची गरज आहे आणि या कामाला वेळ लागेल” असे सांगून काम टाळले जात होते. दोन महिने सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन ढिम्म हलत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप होता.
नागरिकांनी नगरसेवक शरद फडोळ यांची भेट घेऊन व्यथा मांडताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलावून घेतले आणि त्यांना धारेवर धरले. “नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, तातडीने जेट मशीन उपलब्ध करून देऊन ही समस्या सोडवा,” अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासनाला सुनावले. फडोळ यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रमेश सराकरे, काशिनाथ बिरारी, आदित्य काळे, अनिकेत मोरे, गणेश खर्जुल आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद फडोळ यांच्या हस्तक्षेपामुळे दोन महिन्यांपासून रखडलेल्या समस्येला अखेर वाचा फुटली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.