नाशिक (प्रतिनिधी): स्टेट बॅँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी नातेवाईकांची मॅच्युअर झालेल्या बॉण्डसबाबत चौकशी करायची असल्याचे सांगितले. गुंतवणुकीदरम्यान नातेवाईकांनी आपला नंबर दिला असावा म्हणून सोनवणे यांनी भामट्यांना प्रतिसाद दिल्याने ते फसले गले.
मॅच्युअर झालेल्या बॉण्डसबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी शहरातील एका सेवानिवृत्तास लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांच्या चौकशीदरम्यान विश्वास संपादन करीत गुगल पे वरून २० रुपये आँनलाईन टाकण्यास भाग पाडून भामट्यांनी बॅँक खात्यातील रकमेवर परस्पर डल्ला मारला असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
गंगापूररोडवरील पांडूरंग सोनवणे (६९ रा. नक्षत्र कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या गुरूवारी (दि. १३) दुपारच्या सुमारास ते आपल्या घरी असताना सायबर भामट्यांनी त्यांच्याशी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधला. भामट्यांनी विश्वास संपादन करीत व्हेरिफीकेशनच्या बहाण्याने सोनवणे यांना ६२९५२७७८३५ या गुगल पे नंबरवर २० रुपए टाकण्यास भाग पाडले. सोनवणे यांनी त्यानुसार कृती करताच, अवघ्या काही वेळात त्यांच्या बॅँक खात्यातील ९८ हजार ६७२ रुपए अन्य खात्यात परस्पर वर्ग झाले. याबाबतचा संदेश प्राप्त होताच सोनवणे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड करीत आहेत.