शनिवारी संपूर्ण नाशिकचा पाणीपुरवठा बंद; स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या दुरुस्ती कामांना सुरुवात

शहरातील पाणीगळती कमी करणे, पाण्याचे योग्य मोजमाप करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांवर फ्लोमिटर बसवणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची तातडीची दुरुस्ती, नवीन व्हॉल्व्ह बसवणे तसेच क्रॉस कनेक्शन काढून टाकण्याची कामे या कालावधीत केली जाणार आहेत. ही सर्व कामे एकाच वेळी करण्यासाठी २४ तासांचा ‘शटडाऊन’ आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

या दुरुस्ती व सुधारणा कामांचा फटका नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, पंचवटी, सातपूर आणि सिडको (नवीन नाशिक) या सर्व विभागांना बसणार आहे. विशेषतः द्वारका, गांधीनगर, मुक्तीधाम, सातपूर परिसरातील अंबड लिंक रोड, नाईकवाडी यांसारख्या प्रमुख भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे केली जाणार असल्याने या भागांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाच्या सूचना :

  • शनिवार, २० डिसेंबर २०२५ : दिवसभर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

  • रविवार, २१ डिसेंबर २०२५ : सकाळी पाणीपुरवठा सुरू होईल; मात्र सुरुवातीला कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता

महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने घरगुती वापरासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा आधीच करून ठेवावा, पाणी जपून वापरावे आणि या नियोजित कामात महापालिकेला सहकार्य करावे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत, सुरक्षित आणि नियंत्रित होईल, असा विश्वासही महापालिकेने व्यक्त केला आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा बंदीच्या काळात कोणतीही आपत्कालीन अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असेही महापालिकेने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *