खंडणीप्रकरणी चार महिलांविरोधात गुन्हा दाखल

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत पाच लाखांची मागणी

नाशिकरोड | प्रतिनिधी: पतीविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका महिलेकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार महिलांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिला कैलास मैड (वय ४३, रा. जेलरोड) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी (दि. २०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रमिला यांना एका अनोळखी महिलेचा फोन आला. फोन करणाऱ्या महिलेने जेलरोड येथील सैलानी बाबा चौकात भेटण्यास सांगितले. त्यानुसार प्रमिला या आपल्या मुलासोबत तेथे गेल्या. त्याठिकाणी अर्चना, स्नेहल, कविता व रंजना नामक चार महिलांनी, “काही राजकीय लोकांच्या सांगण्यावरून तुझ्या पतीला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे काम आम्हाला देण्यात आले आहे. हे थांबवायचे असेल तर पाच लाख रुपये दे, अन्यथा तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू,” अशी गंभीर धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *