फडणवीस त्र्यंबकेश्वरला, शिंदे सटाण्यात आज शक्तिप्रदर्शन
नाशिक : जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. स्थानिक नेत्यांबरोबरच आता राज्यस्तरीय दिग्गज नेत्यांची थेट मैदानात उतरणी झाल्याने प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज, सोमवार (दि. २४) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर येथे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सटाणा येथे जाहीर सभा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा त्र्यंबकेश्वर येथे मार्केट बाजार समितीसमोरील पटांगण, रेणुका हॉल शेजारी, जव्हार रोड येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ही माहिती भाजप नाशिक ग्रामीण अध्यक्ष सुनील बच्छाव व नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सटाणा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेस शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे उपस्थित राहणार असून सकाळी ११ वाजता पाठक मैदान येथे ही सभा पार पडणार आहे.
या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अॅड. संजय दुसाने, तालुकाप्रमुख सुभाष नंदन, शहरप्रमुख सुनील पाटील, संघटक विशाल आंबेकर, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हर्षदा पाटील व अन्य उमेदवारांनी केले आहे. राज्याच्या सत्ताधारी नेत्यांच्या सभांमुळे नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीची रंगत आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.