अमेरिकेत ‘बर्फाळ’ आणीबाणी! १७ राज्यांत हाय अलर्ट, ६००० उड्डाणे रद्द; जनजीवन विस्कळीत

अमेरिका सध्या दशकातील सर्वात भीषण हिवाळी वादळाचा (Winter Storm) सामना करत असून, संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. जोरदार बर्फवृष्टी, हाडे गोठवणारी थंडी आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे प्रशासनाने आतापर्यंत १७ राज्यांमध्ये ‘आणीबाणी’ (Emergency) जाहीर केली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून ६,००० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
१७ राज्यांमध्ये आणीबाणीचा निर्णय
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अलाबामा, न्यूयॉर्क, टेक्सास, जॉर्जिया, न्यू जर्सी आणि पेनसिल्व्हेनियासह एकूण १७ राज्यांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले असून, अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास न करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
२,००० मैलांपर्यंत वादळाचा विस्तार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या वादळाचा प्रभाव टेक्सासपासून ते न्यू इंग्लंडपर्यंत तब्बल २,००० मैलांच्या परिसरात पसरलेला आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येला शून्याखालील तापमानाचा सामना करावा लागणार आहे. काही भागांत तापमान उणे ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, यामुळे ‘फ्रॉस्टबाइट’चा मोठा धोका निर्माण झाला आहे.
विमान आणि रस्ते वाहतूक ठप्प
खराब हवामानामुळे अमेरिकेतील सर्वात मोठ्या विमानतळांवरील कामकाज थांबवण्यात आले आहे. ६,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाल्याने हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत. अनेक महामार्गांवर बर्फाचे थर साचल्याने रस्ते वाहतूकही धोक्यात आली आहे.
विजेचा पुरवठा खंडित होण्याचे संकट
वेगवान वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे लाखो नागरिक अंधारात राहण्याची शक्यता असून, ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत.
नागरिकांनी मदतीसाठी Ready.gov या संकेतस्थळावर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *