अजित पवारांच्या निधनाने बागलाणवर शोककळा; सटाण्याला अंधारातून बाहेर काढणारा लोकनेता हरपला

सटाणा | तुषार रौंदळ (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर आणि धडाडीचे नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनामुळे सटाणा शहर आणि बागलाण तालुक्यात तीव्र शोककळा पसरली आहे. दादांच्या जाण्याने तालुक्याने आपला एक खंबीर पाठिराखा गमावला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
विकासाचा महामेरू हरपला: दीपिका चव्हाण
बागलाण तालुक्याच्या माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण यांनी या घटनेबद्दल अत्यंत दुःख व्यक्त केले आहे. “अजित दादांनी सटाणा आणि बागलाण तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच शब्दाच्या पलीकडे जाऊन मदत केली. तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय देणारे ते नेते होते,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
सटाण्याचा अंधार दूर करणारी ‘दादा’गिरी: शहराच्या इतिहासातील एका प्रसंगाची आठवण सांगताना दीपिका चव्हाण म्हणाल्या की, “श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सवाच्या काळात सटाणा शहराचे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने संपूर्ण शहर अंधारात होते. ही बाब दादांच्या कानावर घालताच, त्यांनी प्रशासकीय शिष्टाचार बाजूला ठेवून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे ट्रान्सफॉर्मर तात्काळ सटाण्याकडे वळवले. इतकेच नव्हे, तर शहरासाठी स्वतंत्र सब-स्टेशन मंजूर करून विजेचा प्रश्न कायमचा निकाली काढला.”
प्रशासकीय आणि शैक्षणिक योगदान: बागलाण तालुक्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून दादांनी तालुक्याला स्वतंत्र उपविभागीय कार्यालय मिळवून दिले. तसेच, अजमीर-सौंदाणे येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या मंजुरीसाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक ठरले आहे. आज हजारो आदिवासी विद्यार्थी त्यांच्या या निर्णयामुळे उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत.अजित दादांच्या या अकाली निधनामुळे बागलाणमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या हक्काचा आणि थेट कामाचा माणूस गेल्याच्या भावनेने सटाणा शहरवासीय आणि तालुक्यातील जनता आज हळहळ व्यक्त करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *