नाशिक जिल्ह्यात कुस्तीचा रणडंका ; महाराष्ट्र केसरी २०२६ निवड चाचणी

लोहशिंगवेच्या मातीवरच ठरणार महाराष्ट्र केसरी २०२६ चा नाशिक जिल्हा रणसंग्राम!

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र केसरी २०२६ स्पर्धेच्या नाशिक जिल्हा व शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा कै. पहिलवान भगवानराव जुंद्रे यांच्या पवित्र स्मरणार्थ त्यांच्या मूळ गावी लोहशिंगवे (ता. व जि. नाशिक) येथे आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. यासंदर्भात रविवार, दि. १८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता भगूर येथील बलकवडे पतसंस्था येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष ॲड. विशाल बलकवडे यांनी भूषविले. बैठकीस संघाचे पदाधिकारी, वस्ताद, खेळाडू तसेच कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, ही निवड चाचणी कुस्ती स्पर्धा रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता वजन तपासणी, तर दुपारी ३ वाजता कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवानांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. ही स्पर्धा क्रीडा महर्षी पहिलवान भगवानराव जुंद्रे क्रीडांगण, लोहशिंगवे येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन जुंद्रे पहिलवान शिक्षण संस्था व केसरी स्पोर्ट्स क्लब, लोहशिंगवे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असून डॉ. दीपक जुंद्रे, सरपंच युवराज जुंद्रे आणि पैलवान ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पाळदे हे प्रमुख आयोजक असणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे २०२० चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, ऑल इंडिया चॅम्पियन बाळू बोडके, तसेच पवन ढोणर, विजय सुरडे यांच्यासह अनेक नामवंत मल्ल या निवड चाचणीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींना थरारक आणि दर्जेदार कुस्तीचा अनुभव घेता येणार आहे. या बैठकीस प्रवीण पाळदे, अविनाश सहाणे, भगवान जुंद्रे, संजय गायकवाड, विकास मोरे, मनोज चकोर आदी मान्यवर उपस्थित होते. कै. पहिलवान भगवानराव जुंद्रे यांनी कुस्ती क्षेत्रासाठी दिलेल्या अमूल्य योगदानास मानवंदना देणारी ही स्पर्धा नाशिक जिल्ह्यातील कुस्ती परंपरेला अधिक बळ देणारी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *