सुधारित विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत… चुका सुधारण्यासाठी संधी मिळणार असल्याने करदात्यांना दिलासा
-सीए दिलीप सातभाई यांचे प्रतिपादन
नाशिक (प्रतिनिधी)/ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करत केंद्र सरकारने प्राप्तिकर कायदा २०२५ अंतर्गत प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे व करदात्यांना दिलासादायक बदल प्रास्ताविक केले आहे. यामुळे करदात्यावरील अनुपालनाचा ताण कमी होईल, अंतिम तारखांमध्ये सुसूत्रता निर्माण झाल्याने चुका सुधारण्यासाठी संधी मिळणार आहे. कलम २६३(५) नुसार एखाद्या करदात्याने मूळ किंवा विलंबित विवरणपत्र दाखल केल्यानंतर त्यामध्ये चूक किंवा दुरुस्ती असल्यास तो सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतो. असे सुधारित विवरणपत्र संबंधित कर वर्ष समाप्ती पासून ९ महिन्याच्या आत दाखल करावे लागत. ही मुदत ९ महिन्यावरून १२ महिने करण्याचा प्रस्ताव आहे. याचाच अर्थ सदर विवरणपत्र ३१ डिसेंबर ऐवजी ३१ मार्च पर्यंत दाखल करता येईल. याचबरोबर टीसीएस मधील प्रस्तावित बदल देखील दिलासादायक असून परदेशातील शिक्षण व वैद्यकीय कारणासाठी केला जाणारा खर्च यावर सध्या ५ टक्के दर असून तो २ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार असल्याचे पुणे येथील प्रख्यात सीए डॉ. दिलीप सातभाई यांनी म्हटले आहे.
नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स, मालेगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स व अहिल्यानगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्थसंकल्पीय वेबिनार प्रसंगी ते बोलत होते. सीए डॉ. दिलीप सातभाई यांनी प्राप्तिकर कायद्यातील काही महत्त्वपूर्ण बदलांविषयी माहिती देताना पुढे सांगितले की, मोटर अपघातातील नुकसान भरपाई बाबत मृत व्यक्तीची मिळणारी विमा रक्कम यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेक वर्ष दावा प्रलंबित राहिल्यानंतर नुकसान भरपाई देयकास विलंब झाल्या कारणाने विमा रकमेसोबतच व्याज दिले जात व त्या रक्कमेवर टीडीएस कापला जात. अर्थसंकल्पामध्ये याबाबत सुधारणा करण्यात आलेली असून १ एप्रिल २०२६ पासून मोटर अपघातातील नुकसान भरपाई दाव्याच्या रकमेबरोबरच व्याजाची रक्कम ही करमुक्त असेल व त्यावर टीडीएस कपात केली जाणार नाही. ही अतिशय महत्त्वपूर्ण तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी अर्थसंकल्प २०२६ मधील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर याविषयी अर्थसंकल्पात प्रस्तावित असलेल्या बदलांबाबतचे आकलन सर्व कर सल्लागारांना सोप्या भाषेत समजून घेता यावे या उद्देशाने सदरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रमुख वक्ते यांचा परिचय सागर हासे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. विशाखा भामरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्याकरिता सतीश कजवाडकर, अनिल चव्हाण, योगेश कातकाडे आदींनी परिश्रम घेतले.
