दुर्ग छत्तीसगड येथे होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय डाक पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना!

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नाशिक (प्रतिनिधी): दुर्ग (छत्तीसगड) येथे दि. २७ व २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय डाक पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ उत्साहात रवाना झाला आहे. भारतीय टपाल विभागाच्या वतीने देशपातळीवर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या पॅरा क्रीडा स्पर्धेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र सर्कलमधून चार खेळाडूंची निवड करण्यात आली असून ते विविध क्रीडा प्रकारांत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड झालेले खेळाडू श्री. सचिन तायेड, डाक निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, श्री. रत्नाकर शेजवळ कार्यालय सहायक, नाशिकरोड रेल डाक सेवा, श्री. गणेश भगत उपडाकपाल, जळगाव  श्रीमती सानिया नाईकवाडी  डाक सहायक, कोल्हापूर हे सर्व खेळाडू त्यांच्या-त्यांच्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी बजावत असून त्यांनी विभागीय स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन केल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

या दोन दिवसीय स्पर्धेमध्ये बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस आणि बुद्धीबळ या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. देशातील आठ सर्कलमधील दिव्यांग खेळाडू या स्पर्धेत सहभाग नोंदवणार असून स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत. भारतीय डाक विभागाच्या वतीने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामुळे विभागातील पॅरा खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून क्रीडा क्षेत्रात आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र सर्कलने नेहमीच क्रीडा क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. यंदाही राज्यातील खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संघ रवाना होताना विभागीय अधिकाऱ्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत विजयासाठी प्रेरित केले. पहिल्याच अखिल भारतीय डाक पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ उल्लेखनीय यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *